आंबोली
आंबोली
पश्चिम घाट, कितीतरी अद्भुत आणि अद्वितीय गोष्टींची जणू खाण. पश्चिम किनाऱ्याला साधारणतः समांतर असणारा हा घाट गुजरात, महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ आणि तामिळनाडू या राज्यांचे क्षेत्र व्यापून टाकतो. निसर्गप्रेमींना नेहमीच भुरळ घालत आलेला हा घाटात अनेक निसर्ग समृध्द ठिकाणे आहेत. त्यापैकीच एक म्हणजे आंबोली. आंबोली म्हणजे जणू पृथ्वी वरचा स्वर्गच. दरवर्षी हजारो संख्येने लोक आंबोली ला भेट देतात आणि इथल्या निसर्गाच्या प्रेमात वेडी होतात. तर चला तर मग जाणून घेऊया आंबोली विषयी…
आंबोली हे ठिकाण सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये येते. सह्याद्रीच्या विस्तीर्ण पर्वत रांगेत महाराष्ट्राची चेरापुंजी म्हणून ओळखले जाणारे आंबोली हे तालुक्याचे ठिकाण आहे. कोकणी संस्कृतीचा पगडा असणारे हे गाव निसर्गाच्या देणगी ची सदैव मुक्तहस्ते उधळण करत असते. संपूर्ण महाराष्ट्रात आंबोली या ठिकाणी दरवर्षी सर्वात जास्त पाऊस होतो. शहरी गलबला टा पासून दूर, प्रदूषण मुक्तअसे हे ठिकाण आहे. विविध नेत्रसुखद पर्यटन स्थळे, आल्हाद दायक वातावरण, स्वच्छ व मोकळी हवा, स्वच्छ व नेटकी हॉटेल्स, जेवणाची व राहण्याची स्वस्तात मस्त सुविधा यामुळे आंबोली हे वेगाने पर्यटन स्थळ म्हणून पुढे येत आहे.
कसे पोचाल:
आंबोली हे ठिकाण सावंतवाडी पासून जवळपास ३० किलोमीटर अंतरावर आहे. तर बेळगाव पासून सुमारे ६५ किलोमीटर अंतरावर आहे. कोल्हापूर मधून याचे अंतर १३० किलोमीटर इतके होते तर गोव्याची राजधानी पणजी पासून ७५ किलोमीटर अंतरावर हे ठिकाण वसलेले आहे.
१) रस्त्याने (By road)
रस्त्याने या ठिकाणाला चांगली कनेक्टिव्हिटी आहे. जर तुमची स्वतःची गाडी असेल तर तुम्ही निर्धास्त येऊ शकता. महाराष्ट्र व कर्नाटक च्या बस येथून सदैव ये जा करत राहतात. त्यामुळे हा पण एक चांगला ऑप्शन आहे. कोणत्याच खाजगी बस अंबोलितून जात नाहीत.
२) रेल्वे (By rail)
सर्वात जवळचे रेल्वे स्थानक हे सावंतवाडी असून ते अंबोलीपासून ३४ किलोमीटर अंतरावर आहे. मुंबई, पुणे येथून येणाऱ्या पर्यटकांना सावंतवाडी हेच प्रमुख रेल्वे स्थानक असून बेळगाव किंवा कोल्हापूर कडून येणाऱ्या पर्यटकांसाठी जवळ स्थानक नाही.
३) हवाई मार्ग ( aero plane)
आंबोली जवळ गोव्यातील मोपा हे नव्याने निर्माण झालेले विमानतळ आहे. तसेच चीपी आणि दाबोलिम मडगाव ( गोवा) ही विमानतळे सुद्धा हाकेच्या अंतरावर आहेत.
राहण्याची सोय:
आंबोली मध्ये निसर्गप्रेमींनी stay homes ची निर्मिती केलेली आहे. सर्व सोयी सुविधा नियुक्त या होम्स मध्ये राहण्याची, खाण्याची उत्तम व्यवस्था असते. यांचे रेट्स पण एकदम कमी असतात. त्यासोबतच अनेक छोट्या मोठ्या हॉटेल मध्ये सुद्धा राहण्याची उत्तम सोय उपलब्ध आहे. या सर्व ठिकाणी फ्री पार्किंग ची सोय उपलब्ध आहे. नंदन फॉर्म स्टे, चालोबा हिल्स आणि रिसॉर्ट, रेन हिल्स हॉलिडे होम, व्हिस्टलींग वूड्स, शिवमल्हार ही काही नामांकित होम स्टे आणि हॉटेल्स आहेत.
विविध खाद्यपदार्थ:
आंबोली च्या मुख्य बसस्थानक जवळ खूप अशे छोटे स्टॉल्स आहेत. यामध्ये चहा, कॉफी, शिरा, उपमा, मिसळ, वडापाव यासारखे पदार्थ मिळतात. इथली खेखडा भजी खूप फेमस आहेत. शिवाय हॉटेल्स मध्ये देखील उत्तम नाष्टा v जेवणाची सोय आहे. पाऊस म्हटलं की मॅगी आणि मक्याचे कणीस हे पदार्थ आवर्जून आलेच. शीतपेये रस्त्यावर कुठेही मिळतात पण ज्यूस साठी इथे खूप कमी पर्याय उपलब्ध आहेत.
कधी भेट द्याल:
साधारणतः जूनच्या मध्यातून सप्टेंबर संपेपर्यंत चा काळ हा आंबोली येथील पर्यटनासाठी अनुकूल असतो. शक्यतो याच सुमारास देशातून खूप पर्यटक येथे भेट देतात. जुलै मध्ये येथे खूप गर्दी पाहायला भेटते. पण ऑगस्ट नंतर हळू हळू गर्दी कमी होते. साधारणतः ऑक्टोबर नंतर हा प्रदेश मोकळा राहतो. पण सद्या काही हौशी पर्यटक या ठिकाणी कायम स्वरुपी भेट देत असतात. त्यामुळे आता फक्त वर्षा पर्यटना पुरता हा भाग स्तिमित राहिला नाही.
आता आपण येथील पर्यटन स्थळांची सविस्तर माहिती घेऊया:
नांगर तास धबधबा, कावळेसाद पॉइंट, हिरण्यकेशी उगम, महादेवगड टेकड्या, सनसेट पॉइंट, आंबोली धबधबा, शिरगावकर पॉइंट, चौकुळ, आंबोली घाट, आंबोली फॉरेस्ट पार्क..
पर्यटन स्थळांची परिपूर्ण माहिती:
1) आंबोली धबधबा (Water Fall )
आंबोली घाटातील मुख्य आकर्षण म्हणजे आंबोली धबधबा होय. आंबोली धबधबा हा आंबोली पासून २ किलोमीटर अंतरावर आहे. मुख्य आंबोली घाटात असणारा हा धबधबा त्याच्या अक्राळविक्राळ रुपसाठी प्रसिद्ध आहे. सुमारे १२५ फुटा वरून कोसळनारा प्रचंड जलप्रपात, फेसळणारे पाणी, कानात गुंजी घालणारा आवाज अनुभवायचा असेल तर येथे भेट दिलीच पाहिजे. तीव्र उतारावरून पडणारे पाण्याचे थंडगार तुषार, क्षणात धुक्यात हरवून जाणे आणि क्षणात उन पावसाचा खेळ अनुभवावा तो इथेच.
२०२३ मध्ये प्रशासनाने हा मुख्य धबधबा सोडून अजून ४ छोटे मोठे धबधबे पर्यटकांसाठी खुले केलेले आहेत. तेथे सुद्धा आपल्याला पर्यटनाचा आस्वाद घेता येतो.
२) आंबोली घाट ( Amboli ghat)
सुमारे १७ किलोमीटर लांबीचा हा घाट आहे. महाराष्ट्र व गोवा यांना जोडणारा हा दुवा. आंबोली पासून दानोली पर्यंत पसरलेला हा घाट चढने आणि उतरणे म्हणजे एक पर्वणीच. एकदम नागमोडी वळणे , तीव्र उतार, बेफाम पाऊस, थंडगार वारा यातून वाट काढताना अंगावर रोमांच उभे राहतात. त्यातच भर म्हणून घनदाट जंगल, एक बाजूला पसरलेली खोल दरी, रस्त्यावर येणारे धबधब्याचे पाणी आणि लाल व काळ्या तोंडाची मध्येच दिसणारी माकडे यांना पाहिलं की मन भरून येत.
३) नांगर तास धबधबा:
हा धबधबा बेळगाव कडून येताना लागतो. आंबोली पासून ८ किलोमीटर अंतरावर हा पॉइंट आहे. ओढ्याच्या पाण्यावर असलेला हा धबधबा आहे. सुमारे ८-१० फूट लांबीचा पाण्याचा प्रपात प्रचंड उंचावरून खाली कोसळतो. पाणी कोसळून येथे खूप मोठी दरी तयार झालेली आहे. ती किती खोल आहे याचा अंदाज लावणे सध्या कठीण आहे. हा नजारा पाहताना थोडी भीती वाटते.
हा धबधबा पाहता येण्यासाठी प्रशासनाने येथे पादचारी पूल बनवला आहे. त्यावरून याचे विहंगम दृश्य पाहता येते. शिवाय बाजूला एक छोटे पण छान असे मंदिर आहे. तुम्ही त्यालाही भेट देऊ शकता.
४) कावळे साद:
हा पॉइंट म्हणजे एक खोल दरीच आहे. येथे एकाच ठिकाणावरून ५-६ धबधबे कोसळताना पाहायला मिळतात. या धबधब्याचे पाणी हवेच्या दाबामुळे उलते फिरते आणि त्याचे तुषार पर्यटकांना मोहवून टाकतात. असे उलटे धबधबे सध्या खूप दुर्मिळ आहेत. पर्यटकांच्या सोयीसाठी आणि काही अपघात घडू नये म्हणून दरीच्या बाजूने पक्क रेलिंग आहे. त्यामुळे बिनधास्त पर्यटनाचा आनंद घेता येतो.
५) हिरण्यकेशी उगम आणि मंदिर:
या नदीचा उगम हा आंबोली घाटात होतो. ही नदी पुढे आजरा, गडहिंग्लज, संकेश्वर मधून जाऊन घटप्रभा नदीला मिळते. या पॉइंट ला जाण्यासाठी थोडा वेळ ट्रेक करावा लागतो. येथे जंगलाचा घनदाट भाग चालू होतो . भल्या मोठ्या डोंगराच्या खालून येणारे पाणी म्हणजेच हिरण्यकेशी होय. येथे उगमावर भगवान शंकराचे प्रसिद्ध मंदिर आहे. हे मंदिर स्वतः भगवान शिव यांनी निर्माण केले आहे असे समजले जाते. माता पार्वती चे हिरण्यकेशी असे सुद्धा नाव आहे. येथील पाणी एकदम स्वच्छ आहे. हे ठिकाण खूप शांत असून येथे उन्हाळ्यात देखील लोक भेट देत असतात. येथे ट्रेक करण्यासाठी सिमेंट ब्लॉक चा पक्का रस्ता बनवण्यात आला असल्यामुळे जास्त त्रास होत नाही.
६) महादेव गड टेकड्या:
आंबोली पासून ६ किलोमीटर अंतरावर ह्या टेकड्या आहेत. येथून आडव्या तिडव्या पसरलेल्या खूप टेकड्या पाहायला मिळतात. तसेच अरबी समुद्राचे पुसट दर्शन सुद्धा येथून होते. धुक्यात हरवलेल्या या टेकड्या पाहणे म्हणजे एक पर्वणीच आहे. येथे जाताना मात्र स्थानिक लोकांची मदत घ्या. कारण इकडचा रस्ता खूप कठीण असून घनदाट जंगलाने वेडलेला आहे. दाट पसरलेले धुके सुद्धा परिस्थिती नाजूक करू शकते.
७) सनसेट पॉईंट:
हा पॉइंट आंबोली बस स्थानक पासून १.५ किलोमीटर अंतरावर आहे. इतर सनसेट पॉइंट प्रमाणे हा पॉइंट म्हणजे अती उंचीवर आहे. मावळत्या सूर्याला इथून पाहणे खूप नयनरम्य भासते. गडद केशरी रंगात येथील आकाश न्हावून निघते. दररोजचा सूर्यास्त नवनवीन भासतो. संध्याकाळच्या शांत वेळी इथे आवर्जून भेट द्यावीच लागते.
८) शिरगावकर धबधबा:
हे एक पर्यटन दृष्ट्या उत्तम ठिकाण आहे. आपल्या मित्रमैत्रिणी सोबत किंवा कुटुंबासह संध्याकाळची वेळ आपण इथे व्यतीत करू शकतो. आंबोली पासून या पॉइंट पर्यंत जाणारा मार्ग हा घनदाट जंगलाने व्यापलेला आहे त्यामुळे अनेक निसर्गप्रेमी इकडे आकर्षित होतात. आंबोली पासून याचे अंतर फक्त ७ किलोमीटर आहे.
९) आंबोली फॉरेस्ट पार्क:
आंबोली हे जैवविविधतेने समृध्द अस ठिकाण आहे. याच संकलपनेतून या उद्यानाची निर्मिती करण्यात आली आहे. हे उद्यान आंबोली पासून फक्त २ किलोमीटर वर आहे. या उद्यानामध्ये बेडूक, साप, हरीण , चितळ असे प्राणी हमखास पाहायला मिळतात. काही वेळा बिबट्या सुद्धा इथे आलेला इकिवात आहे. फुलपाखरांच्या विविध प्रजाती ही इथे आहेत. वन्यजीव प्रेमिंच्या दृष्टीने हे ठिकाण महत्वाचे आहे. चांगल्या दुर्बिणी द्वारे तुम्ही येथील घटकांची व्यवस्थित पाहणी करू शकता. येथे तुम्हाला गाईड सुद्धा भेटतात.
१०) चौकुळं:
हे गाव अंबोलिपसून ११ किलोमीटर आहे. अतीव पावसाचे हे ठिकाण असून याच्या आजूबाजूचा निसर्गरम्य परिसर मन मोहवून टाकतो. कायम हिरव्या गार कोंदणात वसलेले हे गाव त्याच्या आगळ्या वेगळ्या शेतीसाठी प्रसिद्ध आहे. येथे घटप्रभा नदीचे पात्र आहे. आणि चक्क या नदीच्या पात्रात हे लोक शेती करतात. त्याला ” वायंगणी ” असे म्हणतात. या शेतिद्वारे भाताचे उत्तम आणि भरमसाठ पीक घेतले जाते. ही आगळवेगळी शेतीची पद्धत पाहण्यासाठी तुम्ही एक वेळ अवस्य भेट देऊ शकता.
यासोबतच आंबोली हे जैवविविधतेने समृध्द असे ठिकाण आहे. कुठे ही न आढळणाऱ्या बऱ्याच अशा जीवांची आंबोली येते नोंद करण्यात आली आहे. जागतिक वारसा स्थळ म्हणून आंबोली आणि आसपास च्या ठिकाणांचा उल्लेख होतो. येथे आढळणारी झाडे, फुलपाखरे, सरीसृप, बेडकांच्या प्रजाती, बिबट्या, अस्वल, हरीण, गवे अशा प्रत्येकाला एक अनन्यसाधारण महत्व आहे. काही वेळा येथे पट्टेरी वाघाचे दर्शन होते. तर ब्लॅक पँथर ची सुद्धा नोंद याच भागातून झाली आहे.
निसर्गसौंदरयाने नटलेल्या आंबोलीत येताना आपण आपले नैतिक आणि सामाजिक भान राखले पाहिजे. इथे मुक्त सैर करताना या स्थळांचे नॅचरल सौंदर्य जपले पाहिजे. हा अनमोल ठेवा सगळ्यांनी जपला पाहिजे, मनात साठवला पाहिजे….
येवा, कोकण आपलोच असा….!!!