Bee Farming – मधुमक्षिका पालन

मधमाशी हा जीवन साखळी मधील महत्वाचा घटक आहे. आईनस्टाईन ने सांगितले होते जर मधमाशा नसतील तर मानवी जीवन टिकणे अवघड होऊन जाईल. आपण सर्वांनीच मधाचे पोळे पाहिले असेल आणि त्यातील उत्तम चवीचा मध ही चाखला असेल, पण तुम्हाला माहिती आहे का? याच मधमाशांची शेती सुद्धा केली जाते. होय तुम्ही जे वाचताय ते बरोबरच वाचताय. आज आपण या लेखात मधुमक्षिका पालन काय असते, ते कसे करावे, कुठे करावे, त्यासाठी खर्च किती येतो, सरकारी अनुदान, मधाची वाढती मागणी, किती उत्पादन करता येते आणि उत्पन्न किती मिळते याची संपूर्ण माहिती घेऊया.

What is bee farming? (मधुमक्षिका पालन म्हणजे काय?)

हा एक शेतीपूरक व्यवसाय म्हणून उदयाला येत आहे. अधिकचे उत्पन्न मिळवण्यासाठी शेतकरी याचा उपयोग करू शकतात. सद्या देश विदेशात मधाची मागणी खूप वाढलेली आहे. पण त्या तुलनेत शुद्ध मधाचे उत्पादन खूप कमी आहे. पूर्वीच्या काळी मधमाशांनी जंगलात कडुलिंब, जांभूळ, आंबा, ऐन इत्यादिसारख्या झाडावर बनवलेल्या पोळ्यातून मध काढून घेतला जात होता. पण आता बी फार्मिंग करून याचे उत्पन्न वाढविणे आणि जागतिक बाजारपेठेत त्याला महत्व प्राप्त करून देण्यावर सरकारचा कल आहे. 

मधमाश्या ह्या फुलातील रस म्हणजेच आपण ज्याला पराग म्हणतो, तो शोषून घेतात आणि त्याचे रूपांतर मधामध्ये करतात. महाबळेश्वर मधील मांघर या गावात मधुमक्षिका पालन ला सुरवात झाली. त्यानंतर हे जाळे विस्तारत गेले. सध्या मांघर आणि कोल्हापूर जिल्ह्यातील मधाचे गाव पाटगाव यांची अग्रक्रमाने नावे घेतली जातात.

Reference image ( source – unsplash)

Who can do beekeeping and where? ( मधुमक्षिका पालन कोणी आणि कुठे करू शकतो?)

मधुमक्षिका पालन कोणी ही करू शकतो. शेतकरी, ज्यांना व्यवसायाची आवड आहे असे होतकरू तरुण किंवा तरुणी हा व्यवसाय करू शकतात. पण हा व्यवसाय सुरू करण्याआधी याचे योग्य ते प्रशिक्षण घेणे गरजेचे आहे. यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती दिली जाते. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तज्ञ लोकांकडून प्रशिक्षण भेटते त्याचा तुम्ही लाभ घेऊ शकता. 

आपण हा व्यवसाय कुठे ही करू शकतो, जसे की शेताचा बांध, आपल्या परसात, बागेत,  किंवा पडीक जमीन. जर आपल्याकडे खाद्य जास्त असेल म्हणजे फुलांची उपलब्धता खूप प्रमाणात असेल तर उत्तम आहे. त्यासोबत खाद्याची व्यवस्था करण्यासाठी शेतामध्ये वेगवेगळ्या फळभाज्या जसे की कांदा, कारले, दोडका, बटाटा, टोमॅटो यासारखी पिके घ्यावी. आणि फुलझाडांची लागवड करावी जेणेकरून मधमाशा खाद्य मिळवू शकतील.

Costs and government subsidies (खर्च आणि सरकारी अनुदान:)

हा कमी खर्चात करण्यासारखा व्यवसाय आहे. यासाठी सुरवातीला आपण जागेची निवड केल्यावर मधमाशी पालन पेटी घ्यावी लागते. या पेठीमध्ये दोन विभाग असतात. पहिला म्हणजे रूम चंबर आणि दुसरा म्हणजे हनी चंबर. नवीन व्यवसाय करणाऱ्या लोकांनी कमीत कमी ४-५ पेट्या आणि जास्तीत जास्त ९-१० पेट्या विकत घ्याव्यात. एका पेटीची साधारण किंमत ५०००-६००० रुपये असते. आणि इतर साहित्य असे १० पेट्यांसाठी ७००००-७५००० रुपये खर्च येतो. यासाठी प्रत्येक राज्यात कमी अधिक प्रमाणात अनुदान मिळते. महाराष्ट्र शासन ७०% अनुदान देते.

What should you be careful of?(काय काळजी घ्यावी?)

साधारणता एक एकर परिसरात ५ पेट्या ठेवाव्यात. जर खाद्य पदार्थांची उपलब्धता जास्त असेल तर २० गुंठ्यांत ही ५ पेट्या ठेऊ शकता. उन्हाळा, पावसाळा आणि हिवाळा या तिन्ही ऋतूत या पेट्यांची काळजी घेणे महत्वाचे आहे. पेट्या ह्या प्रामुख्याने लोखंडाच्या असतात. त्यामुळे उन्हाळ्यामध्ये जास्त तापतात. त्यापासून संरक्षण म्हणून सावलीच्या ठिकाणी या पेट्या ठेवणे योग्य राहील. पावसाळा असेल त्यावेळी या माशांना बाहेर पडायला अडचण येते त्यावेळी शक्यतो जिथं पाऊस डायरेक्ट पेटीवर लागणार नाही अशा ठिकाणी त्यांची व्यवस्था करावी. आणि हिवाळ्यामध्ये कोरड्या ठिकाणी पेट्या ठेऊन द्याव्यात. याचबरोबर शक्य तेवढी जास्त खाद्याची व्यवस्था करण्यावर भर द्यायला हवा. त्यामुळे उत्पादन वाढीस मदत होईल.

How is honey produced in beehives?( पेट्या मध्ये मध कसा तयार होतो?)

वर सांगितल्याप्रमाणे येथे रूम चेंबर आणि हनी चेंबर असे दोन विभाग असतात. हे दोन्ही विभाग एका प्लास्टिक अवरणाने वेगळे करतात. राणी माशी रूम चेंबर मध्ये राहते तर तिला सपोर्ट करणाऱ्या बिल्डर मधमाश्या ह्या बाहेर फुलारून परागकण शोषून आणायचे काम करतात. सुरवातीला मधमाशा रूम चेंबर मध्ये त्यांना लागणाऱ्या खाद्याची व्यवस्था करून ठेवतात. रूम चेंबर खाली आणि त्यावर हनी चेंबर असतो. या रूम चेंबर मध्ये राणी माशी राहते. माशांना लागणाऱ्या खाद्याची व्यवस्था करण्यासाठी त्यांना किमान ६ ते ८ महिने लागतात. त्यांनी पुरेसे खाद्य साठवल्यावर त्या हनी चेंबर मध्ये मध साठवायला लागतात. जो मध हनी चेंबर मध्ये असतो तोच आपण काढून घेतो.

The balance between production and income:(उत्पादन आणि उत्पन्न याचा ताळमेळ)

बाजारपेठेत मधाला ४०० ते ७०० रुपये किलो असा दर आहे. जर तुम्ही १० पेत्यापासून सुरुवात केली आणि प्रती पेठी १०० किलो मध तयार झाला तरी तुम्हाला वार्षिक ४-५ लाख रुपये इतका फायदा मिळतो. जर तुम्ही जास्त पेट्या वापरात असाल तर त्या पद्धतीने तुमच्या नफ्यामध्ये वाढ दिसेल. एकंदरीत हा व्यवसाय कमी खर्चाचा पण भरघोस उत्पन्न मिळवून देणारा आहे.

Benefits of natural honey and honey obtained through beekeeping: (नैसर्गिक मध आणि मधमाशी पालन करून कमावलेला मध यातील फायदे)

बऱ्याच लोकांना अस वाटत की मानव आपल्या स्वार्थासाठी मधमाशी पालन करून मध कमावतो. पण यामध्ये काहीच तथ्य नाही. जी आपली पारंपरिक मध कमावण्याची पद्धत आहे त्याच्या त्रुटी खूप आहेत. मधमाशी हा जीवन साखळीतील महत्वाचा घटक मानतो. नैसर्गिक मधाचे पोळे काढताना आपण त्या मधमाशा उठवून लावतो. यामध्ये बऱ्याचश्या माशा दगावतात. त्यामुळे त्यांची संख्या कमी होते. आपण सगळाच मध घेत असल्यामुळे त्यांच्या खाण्यावर मर्यादा येतात. याउलट मधमाशी पाळणामध्ये आपण त्यांना राहण्यासाठी एक सहज सुलभ आणि सुरक्षित अधिवास तयार करतो. त्यामुळे त्यांची संख्या वाढण्यास मदत होते. जेवढी संख्या जास्त तेवढा मधाचा साठा जास्त होण्यास मदत होते.

Benefits of honey: (मधाचे फायदे)

मध हा स्वादिष्ट पदार्थ आहे. आयुर्वेदात त्याचे खूप फायदे सांगितले आहेत. निरोगी आयुष्यासाठी मध खूप उपयुक्त आहे. 

१) दररोज सकाळी उपाशी पोटी मध खाल्याने शरीरातील चरबीचे प्रमाण कमी होते. 

२) मधामध्ये व्हिटॅमिन सी, व्हिटॅमिन बी, प्रथिने आणि कार्ब मोठ्या प्रमाणावर असतात त्यामुळे शरीराला ताकत भेटते. 

३) प्राचीन काळापासून खोखला लागल्यावर मधाचे सेवन करतात. यामुळे घशाची जळजळ कमी होते. 

४) ज्या लोकांना निद्रानाश चा त्रास आहे अशा लोकांनी रात्री झोपण्यापूर्वी गरम दुधातून मध घ्यावा. या समस्येपासून आराम भेटतो. 

५) जर त्वचेवर जखम झाली असेल किंवा त्वचा जळाली असेल तर त्यावर मध लावावा. मध या उत्तम मॉइश्चरयझर चे काम करतो. 

६) मधमध्ये अँटी फंगल, अँटी बॅक्टरियल, अँटी ऑक्सीडांट्स असतात. त्यामुळे याला संपूर्ण आहार देखील म्हटले जाते. 

७) लहान मुलांना बोलायला त्रास होत असेल किंवा बोबडे बोल बोलत असतील तर त्यांना दररोज मध चाखण्यासाठी द्यावा. लगेच फरक पडतो. 

८) वजन कमी करण्यासाठी देखील मधाचा वापर केला जातो. 

९) मधामुळे रोगप्रतिकारक शक्ती वाढते तसेच केसांच्या वाढीसाठी देखील मध उपयुक्त आहे. 

१०) मेंदूच्या वाढीसाठी आणि आरोग्यासाठी मध दुधातून खाण्याचा सल्ला दिला जातो. यामुळे तणाव कमी होतो आणि मन शांत होते. 

११) मधाच्या सेवनामुळे अल्लेर्जी पासून आराम मिळतो आणि पचनक्रिया सुधारते.

Disadvantages of honey: (मधाचे तोटे)

मध खाण्याचे पुष्कळ फायदे आहेत त्यासोबतच आपण तोटे काय आहेत ते पण पाहूया

१) मधुमेह (Diabetes)

मधुमेह असणाऱ्या लोकांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढते – जर अशा रुग्णांनी गरजेपेक्षा जास्त मध खाल्ला तर त्यांच्या रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू शकते. त्यामुळे अशा लोकांनी आवश्यक तेवढाच मध सेवन करावा.

२) डायरिया (Diarrhea)

जर तुम्हाला बद्धकोष्ठता असेल तर मधाचे सेवन कमी करावे. नाही तर पोटाचे विकार, पचन विकार किंवा डायरिया सारख्या समस्या निर्माण होऊ शकतात.

३) दाताचे विकार (Dental disorders)

नैसर्गिक साखरेचे प्रमाण जास्त असल्यामुळे जर प्रमाणापेक्षा जास्त मध खाल्यास दात किडण्याचा धोका संभवतो.

Benefits of beekeeping: (मधमाशी पालनाचे फायदे)

१) मधमाशी पालन करत असताना आपण त्यांना सुरक्षित अधिवास निर्माण करून देत असल्यामुळे त्यांची संख्या वाढते त्यामुळे पर्यावरणाचा बॅलन्स राखला जातो. 

२) हा शेतीपूरक जोडधंदा असल्यामुळे उत्पन्नाचे स्त्रोत वाढण्यास मदत होते. ग्रामीण भागातील रोजगाराचे प्रश्न सुटतात. 

३)मध आणि त्यावर आधारित इतर उत्पादने घेता येतात ज्यांची बाजारपेठेत मोठी मागणी आहे. 

४) मधमाशा परागिकरणाचे काम खूप छान करतात. त्यामुळे शेतीचे उत्पन्न वाढण्यास मदत होते. शेतालगत मधमाशी पालन केल्यास शेतीला वाढीव खते द्यावी लागत नाहीत. फळभाज्यांच्या उत्पन्नात दीड पट वाढ होऊ शकते. 

५) इतर व्यवसाय च्या दृष्टीने मधमाशी पालनात खर्च कमी आहे, वेळेची बचत होते आणि जागा ही खूप कमी लागते. 

६) जर तुमच्याकडे पडीक जमीन असेल तर यामध्ये मधमाशी पालन केल्यास अधिकचा नफा मिळवता येतो. 

शेवटी जाता जाता, मधमाशी पालन करून मधाचे उत्पादन करणे हा एक उत्तम व्यवसाय आहे. कमी खर्च, कमी जागा आणि कोणीही, कुठेही करू शकणारा हा व्यवसाय आहे. मधाचे उत्पादन, त्यापासून उपपदार्थ बनवले जाऊ शकतात. मेन, जेली, मध्यापासून चोकलेट, बर्फी, फेस वॉश सारखे उपपदार्थ बनवून त्यांचे पॅकिंग आणि मार्केटिंग स्वतः केल्यास अधिक फायदा मिळू शकतो. १०, १५ लोकांचा समूह एकत्र येऊन हा व्यवसाय केल्यास उत्पादन, पॅकिंग आणि मार्केटिंग चा खर्च अजून कमी करता येतो. परिणामी जास्त नफा मिळतो. गावातील महिला बचत गट किंवा तत्सम समूह यामध्ये हातभार लावू शकतात. एखाद्या ठिकाणी उत्पादन जास्त असेल तर एखादी मोठी कंपनी त्या ठिकाणाहून डायरेक्ट माल उचलू शकतो त्यामुळे ट्रान्सपोर्टचा खर्च कमी होतो. सुशिक्षित बेरोजगार तरुण या व्यवसायाकडे वळले आणि तर बेरोजगारी कमी होण्यास मदत होईल. अशा तरुण तरुणींनी आपल्या युक्त्या हा व्यवसायात लावल्या तर त्यांना मान मिळेल. जागतिक बाजारपेठेत मध आणि मधाचे पदार्थ यांची वाढलेली मागणी लक्षात घेता आणि मधाचे होणारे उत्पादन लक्षात घेता हा एक उत्तम नफा कमवून देणारा व्यवसाय आहे. मधमाशी हा नैसर्गिक साखळीतील अती महत्वाचा जीव असल्यामुळे त्यांचे पालन करून, त्यांची संख्या वाढवून जैवविविधता बॅलन्स करण्याचे काम सुद्धा नकळत होऊन जाते. शेती सोबत अधिकचे उत्पन्न, मानमरातब मिळवून देणाऱ्या या व्यवसायात तसेच पर्यावरण पूरक असलेला हा व्यवसाय करून आपले आर्थिक आणि सामाजिक स्थैर्य मिळावू शकतो.